"शिवस्मारक व शिवचरित्र वाद - इतिहासाचे सत्यशोधन की ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद'
पुणे - "छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे अनेक पैलू समोर येऊ नयेत, म्हणून त्यांना निरर्थक वादात अडकवून ठेवण्यात येत असून, आपणही अस्मितेच्या विषयामुळे त्यावर प्रतिक्रिया देत आहोत. यापुढे अस्मिता जपतानाच शिवरायांच्या विविधांगी इतिहासाचा अभ्यास करणे, ही काळाची गरज आहे,'' असे मत इतिहासाचे अभ्यासक चंद्रशेखर शिखरे यांनी शनिवारी व्यक्त केले.राष्ट्रसेवा समूहातर्फे आयोजित "शिवस्मारक व शिवचरित्र वाद - इतिहासाचे सत्यशोधन की ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद' या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. वसंतराव मोरे, प्रवीण गायकवाड, गंगाधर बनबरे आणि राहुल पोकळे या वेळी उपस्थित होते.
शिखरे म्हणाले, "आम्ही इतिहासातील घटनांचा अन्वयार्थ शोषितांच्या दृष्टिकोनातून लावणार आहोत, हा जातीयवाद नव्हे. चुकीचा इतिहास वाचल्यामुळे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत. इतिहासाचे मापदंड तुम्ही ठरविणे बंद करावे. शिवभारत आणि जेधे शकावली या प्रमुख पुराव्यांमधील नोंदींनुसार दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू असल्याचा कोठेही उल्लेख नाही.''
या चर्चासत्रासाठी निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे आणि पांडुरंग बलकवडे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते; मात्र ते या वेळी उपस्थित नव्हते. त्याचा उल्लेख करून "तुम्ही समोरासमोर का येत नाही,' असा प्रश्न मोरे यांनी विचारला.
बनबरे म्हणाले, ""आम्ही आमच्या विचारांनी संस्कृतीचे चित्र मांडू पाहतो, त्याला तुम्ही ब्राह्मणद्वेष म्हणत असाल, तर त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.'' जातीयवादाचा मुद्दा निर्माण करून शिवचरित्राविषयीचे पक्के पुरावे दृष्टिआड करण्याचे हे षड्यंत्र आहे, अशी टीका गायकवाड यांनी केली.
sambhaji brigade,maratha seva sangh,banbare,chandrashekhar shikhre,shivaji maharaj,pravin gaikwad,shivdharma,marathi,raj thakre,shivsena