Saturday, January 29, 2011

शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता...

अ‍ॅड. अनंत दारवटकर.
दादोजी कोंडदेव शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली.

७ जानेवारीच्या लोकप्रभात ‘दादाजीपंती सिउबांस शाहणे केले’ हा पांडुरंग बलकवडे यांचा लेख वाचण्यात आला. लेख वाचून वाईट वाटले. आपल्याला पुढे याच विषयाच्या अनुषंगाने काही नवीन माहिती येईल, ती संशोधित केलेली असेल, त्याचा अर्थ लावण्यासाठी खूप खल केला असेल, शक्य आहे तेवढय़ा सर्व बाजूने तपासला असेल, त्या प्रत्येक बाजूवर विचारपूर्वक विचार मांडला असेल, आणि सर्वात महत्त्वाचे हे की, यामध्ये कोणाचीही बाजू न घेता शोध लेख सादर केला असेल, असे वाटले होते. परंतु पूर्ण निराशा झाली. बलकवडे यांनी दिलेली जंत्री पाहिल्यानंतर प्रथमदर्शनीच एक बाब लक्षात येते की, त्यांनी दिलेल्या जंत्रीचे कागद त्यांनी वाचले असावेत. परंतु त्यातील खरे-खोटेपणा त्या कागदपत्रातून निघत असलेला अर्थ, लिहिणारांस अभिप्रेत असणारा अर्थ लावण्याच्या भानगडीत ते पडले नसल्याचे दिसून येते. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे असे की, तो कागद बनावट नाही ना? त्यामधील मजकुरात काही फेरफार केला नाही नां? हे तपासण्याची तसदी त्यांनी घेतल्याची दिसून येत नाही.
बलकवडय़ांनी जे काही लिहिले आहे त्याकडेच जरा वळू.
१) शाहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवाची नेमणूक केलेली होती.
- हे पूर्णत: चूक आहे. शाहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शाहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.
इ.स. १६३६ नोव्हे./डिसें. तथा जाने. १६३७ मध्ये रणदुल्लाखानाच्या आश्रयाने सख्य झाल्यामुळे मुर्तुजा निजामशहास खानजमान याचे हवाली करून शिवनेरी, माहुलीसह शेवटचे सहा किल्ले आदिलशाहीकडे सोपवून शाहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, शिवाजीराजे यांचेसह विजापुरास पोहोचले, त्यावेळी दादोजी कोंडदेव हा शिवनेरीवर आदिलशाहीचा चाकर म्हणून पुढचे काम पाहण्यास पोहोचला होता. सन १६३७ मध्येच विजापुरी शिवाजी राजे व सईबाईसाहेब यांच्या विवाह झाल्यानंतर पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी शिवाजी राजे व जिजाऊ यांची नेमणूक करून त्यांना इतर कारकुनांसह सन १६३९ मध्ये पुण्यास पाठविले आहे. त्यावेळी दादोजी कोंडदेव विजापूरचा चाकर म्हणून विजापूरकरांसाठी पुणे परगण्याचा कारभार पाहात होता.
२) त्याचा कारभार शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादोजी कोंडदेव पाहात असे.
यातील ‘शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार’ हे पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. इतिहास असे सांगतो की, दादोजी कोंडदेवाने कारकून म्हणून आदिलशाहीची नोकरी पत्करली, नंतर तो हवालदार झाला, त्यानंतर सुभेदार होऊन अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आदिलशाहीची चाकरी केलेली आहे. त्यास सुभेदार करण्याचा अधिकार शाहाजी राजांचा नसून आदिलशाहाचा होता. येथे एक बाब स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, सन १६३२ ते १६३६ अखेर शाहाजीराजे हे निजामशाहाचे पूर्ण अखत्यार होते तर दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीचा चाकर होता. म्हणजे शाहाजीराजे ज्यांच्या विरुद्ध लढा देत होते त्या शत्रुपक्षाचे कारकून दादोजी कोंडदेव होते. अशा शत्रुपक्षातील माणूस शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.
३) दादाजी कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे.
- उल्लेखाच्या अनुषंगाने हेही चुकीचे आहे. कोंडदेवाचा उल्लेख सन १६३० मध्येही सापडतो. ता. १८ सप्टेंबर १६३० च्या कौलनाम्यात ‘राजश्री पंत हवालदाराचा कौलु दिल्हा आहे.’ असा उल्लेख सापडतो. यामध्ये सरळ दादोजी कोंडदेव असा उल्लेख नसला तरी ‘पंत’ हा उल्लेख दादोजी कोंडदेवासाठी आहे, हे संपूर्ण पत्र वाचले असता लक्षात येते. तर मग, अनेक पत्रांचा उल्लेख करणाऱ्या त्या लेखकाच्या लक्षात हे पत्र आले नाही कां? माझ्या मते ते त्यांच्या लक्षात आले असावे, परंतु त्यांनी ते जाणीवपूर्वक देण्याचे टाळले असावे, कारण काय असावे?
आदिलशाही सेनापती मुरार जगदेवाने सन १६३० मध्ये शाहाजीराजांच्या जहागिरीच्या प्रांतांवर स्वारी केली होती. याबाबत सहा कलमी शकावलीत ‘ही स्वारी शके १५५२ म्हणजे सन १६३०-३१ मध्ये केलेली होती’ असे दिलेले आहे. या स्वारीबरोबर शाहाजीराजे ३० नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखान मोगलांस मिळाले. इकडे मुरार जगदेवाने रायारावाने पुणे जाळले. पुण्याचा आदिलशाही हवालदार दादोजी कोंडदेव होता. म्हणजे पुणे जाळण्यामध्ये दादोजी कोंडदेवही होता हे स्पष्ट आहे. तसे नसल्यास आदिलशाही सेनापती पुणे जाळण्यास आला असता आदिलशाही हवालदार घरात लपून बसला असे म्हणायचे का? ही बला टाळण्यासाठी लेखकाने कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख सन १६३३ पर्यंत सीमित केला. म्हणजे सन १६३० मधील पुणे जाळण्याचा उल्लेख टाळण्यास सोपे पडावे. दादोजी कोंडदेवाने पुणे जाळल्यामुळेच सन १६३७ मध्ये ‘शांती’ करण्याची गरज त्यास भासली काय? लेखकाने याचा पुनश्च शोध घ्यावा असे सुचवावेसे वाटते.
४) शिवापूर येथील आंबराई, आंबा व अंगरख्याची बाही छाटणे
- लेखकाने यास आख्यायिका संबोधले आहे. तर मग त्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या लेखात आख्यायिका देणाऱ्या माणसांस इतिहास संशोधक म्हणता येईल का? इतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबऱ्या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. आख्यायिका सत्य नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे. ती ते लेखक देतात! आणि आपण इतिहास संशोधक नाही हे सिद्ध करतात. इथे तारतम्याचा व शोधक बुद्धीचा अभाव दिसून येतो.
आता जरा आंबराई प्रकरणाकडे वळू. शिवाजी महाराज जिजामाता सन १६३९ मध्ये पुण्यास आले. सन १६४०-४१ मध्ये कारभारीय दृष्टीने दादोजी ही व्यक्ती त्यांच्यासमोर आली. कारण जिजामाता व शिवाजी राजांचे कारभारी वेगळे होते. त्यांची नावे इतिहासात स्पष्टपणे सापडतात. कोंडदेवाचा मृत्यू जुलै १६४६ मध्ये झालेला आहे. याचा अर्थ शिवाजी महाराज व दादो कोंडदेवाचा संबंध केवळ साडेपाच वर्षेच आला होता. काहींच्या म्हणण्यानुसार तो चार वर्षेच आला होता. तरीसुद्धा आपण साडेपाच वर्षेच धरली आहेत.

शाहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शाहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.

एखादे वर्ष इकडे-तिकडे झाले तरी ह्या मुद्यासाठी फरक पडणार नाही. आल्याबरोबर जिजामातेने आंबराईचा हुकूम केला असे कोणीही मान्य करणार नाही. पहिली दोन वर्षे तर निश्चितपणे कारभारीय स्थिरतेसाठी गेली असणार हे उघड आहे. आता राहिलेल्या साडेतीन वषार्ंच्या सुरुवातीस आंब्याच्या कोया भूमीत लावल्या (पुरल्या) तर त्याकाळानुसार ती झाडे मोठी होण्यासाठी व त्यांना फळे येण्यासाठी ८/१० वर्षे लागत होती. काही संदर्भ असे सापडतात की त्या काळी आंब्यास फळे येण्यास १४/१५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागत असे. म्हणून शिवाजी महाराजांनी आंब्यासारखी झाडे तोडण्यास मनाई केली होती. आता साधा विचार करणे आवश्यक आहे की, जर ही बाग कोंडदेवाने लावली असती तर त्या आंब्यास साधारण संभाजी राजांच्या जन्मसालाच्या दरम्यान म्हणजे सन १६५७ च्या दरम्यान अथवा त्यानंतर फळे आली असती, तर त्या वेळेस आंब्याच्या झाडाचे फळ तोडण्यास दादोजी कोंडदेव जिवंत होता काय? समजा, दादोजी कोंडदेवाने आंबा तोडल्याचे खरे धरले तर आंब्याची बाग स्वत: शाहाजी राजांनी सन १६३२ च्या दरम्यान लावली होती, असा अर्थ होतो, व ती त्यांनी लावली असल्यामुळेच त्यास ‘शाहाबाग’ हे नाव पडले असावे.
त्याचप्रमाणे बागेबरोबरच शाहाजी राजांनी स्वत:साठी वाडा बांधला होता. म्हणजेच शिवापूरची आंबराई, तेथील राहण्याचा वाडा हे सर्व काम कोंडदेवाने केलेले नसून ‘शाहाजी राजांनी’ केलेले होते हे स्पष्ट आहे. कोंडदेवाच्या उदात्तीकरणासाठी अंगरख्याची बाही कापल्याची लहान मुलांच्या गोष्टीसारखी सांगितलेली कथा-भाकड तथा खोटी आहे हेही स्पष्ट होते.
५) मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला. परंतु त्याने जे इनसाफ केले ते औरंगजेब पादशहासही वंद्य जाहले.
- हे उद्गार शाहू महाराजांनी काढल्याचे समकालीन पत्रात नमूद केलले आहे असे त्या लेखकाचे म्हणणे आहे. त्यांनी या पत्रावर पूर्ण विश्वास ठेवल्याचे दिसून येते. हे पत्र त्यांनी नीट तपासणे आवश्यक होते, ते तपासलेले दिसत नाही. या पत्राची तारीख साल त्यांनी दिलेले नाही. समकालीन म्हणजे शाहू महाराज छत्रपती असल्याच्या म्हणजेच इ.स. १७०७ ते १७४९ हा काळ गृहीत धरावा लागतो. शाहू महाराज वयाच्या सातव्या वर्षी औरंगजेबाच्या कैदेत गेले आहेत तर वयाच्या पंचविसाव्या वर्षी म्हणजेच सन १७०७ मध्ये त्यांची सुटका झाली आहे. छ. संभाजी महाराजांच्या काळासारखाच हा काळ औरंगजेबासाठी अत्यंत धामधुमीचा परंतु हलाखीचा होता. मराठय़ांनी औरंगजेबाची अत्यंत वाईट हालत केली. सैनिकांचा पगार देण्यासाठी औरंगजेबास आपल्या स्वयंपाकातील चांदीची भांडी वितळावी लागली होती. अशा परिस्थितीत औरंगजेब शाहू महाराजांजवळ दादोजी कोंडदेवाची स्तुती करीत बसेल, हे शक्य नाही. दुसरे असे की, औरंगजेबास दादोजी कोंडदेवाची माहिती असणे हेही शक्य नाही. कारण दादोजी कोंडदेवाच्या हयातीत किंवा बादशाहा होण्यासाठी धडपडणाऱ्या सालापर्यंत म्हणजेच १६५७ पर्यंत आणि त्यानंतर छ. संभाजी महाराजांच्या काळापर्यंत औरंगजेब पुण्यास आल्याची नोंद नाही, त्यामुळे कोंडदेवाची स्तुती करण्याचा प्रश्नच राहात नाही. यावरून हे पत्र तथा उल्लेख बनावट असल्याचे सिद्ध होत आहे.

इतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबऱ्या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे.

६) सोन्याचा नांगर
- या लेखात सहा कलमी शकावलीतील सोन्याच्या नांगराचा उल्लेख केला आहे. सोन्याच्या नांगराचे समूहशिल्प याच नोंदीवरून केले आहे. कळीचा मुद्दा असलेले हे कलम आहे. एकार्ध पानाच्या या शकावलीतील नोंदी बऱ्याच नंतरच्या काळात नोंदल्या असल्यामुळे हे विश्वसनीय साधन नाही, याबाबत सर्व अभ्यासक/संशोधकांचे एकमत आहे. मग सोन्याच्या नांगराची ग्राह्यता कशी धरता येईल?
सहा कलमी शकावली ही दादोजी कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी लिहिलेली असावी हे सहाव्या कलमातील नोंदीवरून लक्षात येते. याच शकावलीच्या दुसऱ्या कलमात गाढवाचा नांगर धरल्याचा उल्लेख आहे तर सहाव्या कलमात सोन्याच्या नांगराचा उल्लेख आहे, यावरून वरील म्हणण्यास बळकटी येते. विशेष असे की, या दोन्ही नोंदीची ग्राह्यता अजिबात नाही. हे पुण्यातील अभ्यासक/संशोधकांना चांगले माहिती आहे.
७) बखरींमधील उल्लेख
दादोजी कोंडदेवाचे मोठेपण सांगताना, यातील सुसंगत्व व पूरकत्त्व दाखविण्यासाठी लेखकाने तीन बखरींमधील उल्लेख दिलेले आहेत. १. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, २. शेडगांवकर भोसले बखर, ३. शिवदिग्विजय बखर.
सर्व बखरी ह्या सातारच्या छत्रपतींच्या उत्तरकाळात म्हणजेच इ.स. १७६०/७० नंतर लिहिलेल्या आहेत. वरील तीनही बखरींस हे प्रमाण लागते.
‘९१ कलमी बखर’ ही शिवछत्रपतींचा मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिवीस याने लिहिलेली आहे असा प्रवाद होता. परंतु ही बखर दत्ताजी त्रिमल वाकेनिवीसाने लिहिलेली नाही याचे अनेक पुरावे आहेत. ह्या बखरीत शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाची तिथी काय दिली आहे ती पहा ‘कलम ८७ - ‘राजाभिषेक - त्याउप्पर वेदमूर्ती गागाभट वाराणसीकर येऊन रायेगडी राजेस्वामीस मुंजीबंधन पट्टाअभिषेक सिंह्यासनारूढ जाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे चैत्र सुध प्रतीपदा’
शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीप्रमाणे त्यांच्या राज्यारोहणाच्या तिथीचाही घोळ घालण्यात आला आहे. परंतु तो घोळ ज्येष्ठ शु. ११, १२ आणि १३ भोवतीच फिरत होता. ९१ कलमी बखरीच्या नक्कलकाराने यावर ताण केली. त्याने शिवाजी महाराजांचा राज्यारोहण सोहळा वर नमूद केल्याप्रमाणे चैत्रात नेला आणि राज्यारोहणाची तिथी म्हणून शिवाजी महाराजांची मृत्युतिथी ‘चैत्र सुध प्रतीपदा’ देऊन मोकळा झाला. या कर्मास काय म्हणावे? अशी रचना राज्याभिषेकाच्या वेळी हजर असणाऱ्या, पट्टाभिषेकावेळी वायव्यकोनास मंत्री म्हणून चामर घेऊन उभ्या राहिलेल्या माणसाच्या हातून घडेल काय? यावरून ‘९१ कलमी बखर’ ही मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिवीसाने लिहिलेली नसून बनवेगिरीच्या धाग्यातील महाभागाने लिहिलेली आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल. अशा ह्या बखरीतील दादोजी कोंडदेवासंबंधीचा उतारा तथा उल्लेख प्रमाण म्हणून मानावा हे योग्य आहे का?
शेडगांवकर भोसले बखर :- लेखकाने ह्या बखरीतील मजकूर असा दिला आहे, ‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यास तयार केले.’
आता ह्या बखरीच्या छापील प्रतीत पृ. १६ वर काय आहे पाहा, ‘तेव्हा त्याचे वडील शाहाजीराजे महाराज वजीर त्याचे वेळचे दादो कोंडदेव कारकून ब्राह्मण हा शिवाजीराजे याजला बाळपणी सिक्षाधारी विद्याभास करणारा तो फार शाहाणा व मोठा शुर होता.’
आपण वरील दोन्ही परिच्छेदाचे अवलोकन केले असता काय दिसते? त्या लेखकाने शब्दांची हेराफेरी करून पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते. कदाचित आपणास वाचण्यास सोपे पडावे म्हणून हे केले असावे असे म्हणता येऊ शकते. परंतु ते तसे नाही, लेखकाने ह्या परिच्छेदातील बाळपणी हा शब्दच खाऊन टाकला आहे. म्हणजे त्यास ‘शिवाजी महाराजांच्या बाळपणी दादोजी कोंडदेव महाराजांचे शिक्षक नव्हते’ याची पक्की माहिती असणार. आणि पुरावे तसेच सांगत आहेत, म्हणून त्या लेखकाने हा शब्दच गाळून टाकला. आपल्या सर्वाच्या माहितीसाठी हे नमूद करतो की, बाराव्या वर्षांनंतर शिवाजी महाराज जिजामातेसह पुणे परगण्यात आले आहेत. त्यानंतरच म्हणजे वयाच्या १३/१४ व्या वर्षी त्यांचा दादोजीशी संपर्क आलेला आहे. यावरून ते ‘बाळपणी सिक्षाधारी’ होते हे कोठे बसत आहे? बाराव्या वर्षांनंतरच्या वयाला त्या काळी ‘बाळपण’ म्हणत नव्हते.
८) मुहंमद आदिलशाहाचे सन १६४४ चे फर्मान
बलकवडे यांनी आदिलशाहाच्या अत्यंत महत्त्वाच्या फर्मानाचा उल्लेख केला आहे. दादोजी कोंडदेवाने सन १६४४ मध्ये शाहाजी राजांची साथ सोडली नाही हे दाखविण्यासाठी याचा उल्लेख लेखात आला आहे. या फर्मानाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत. १. सन १६४४ मध्ये शाहाजी राजे आदिलशाही दरबारातून खरोखरीच निर्वासित झाले होते काय? २. कोंडदेव या सालात शाहाजी राजांचे मुतालिक होते की आदिलशाहाचे सुभेदार होते. ३. शाहाजी राजांच्या पारिपत्यासाठी सैन्य न पाठवता कोंडदेवाच्या पारिपत्यासाठी स्वारी पाठविली हे कसे? ४. अन्यत्र याचा उल्लेख कसा आला नाही? ५. हे फर्मान जेध्यांना पाठविले नाही मग त्यांच्या कागदपत्रांत हे फर्मान सापडले हे कसे? यासारखे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात, याचा शोध त्या लेखकाने घेतल्याचे दिसून येत नाही. या पत्रात कोंडदेवास ‘शाहाजी राजांचा मुतालिक’ असा उल्लेख आल्याचे दिसून येत आहे. हे फर्मान खरे किती खोटे किती हा मुद्दा जरा बाजूला ठेवू. परंतु यावरूनच एक बाब आपल्या निदर्शनास येते, ती म्हणजे, सन १६४४ मध्ये शाहाजीराजे विजापुराहून बाहेर गेले होते. ते कोठे गेले होते? ते स्वराज्यात-महाराष्ट्रात आले होते. याबाबत दि. २८ फेब्रुवारी १६४४ मध्ये शाहाजी राजांनी कारकून व देशमुख परगणे पुणे यांना महादभट पुरंदरे याबाबत पाठविलेले फर्मान तथा खुर्दखत सापडते. त्यात त्यांनी पुणे प्रांतातील दोन गावांचे इनाम दिल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ शाहाजी राजे विजापूर दरबारातून निर्वासित झाले नसून ते स्वराज्यातील कारभारासाठी जिजाऊ व शिवाजीराजे यांच्याकडे आले होते, त्याचा हा भक्कम पुरावा आहे. याप्रमाणे शाहाजी राजे हे प्रत्येक दोन वर्षांनी स्वराज्यात येत होते. तरीसुद्धा त्याचा शोध घ्यायचा सोडून, ते सन १६६१ पर्यंत आलेच नव्हते असे बनावट विधान आजपर्यंतच्या लेखकांनी केले आहे.
त्या लेखकाने कृ. अ. केळूस्कर, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, यांच्यासह दोघा-तिघांची नामावली दिली आहे. ती अत्यंत त्रोटक आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही दादोजी कोंडदेवाचा शोध घेतला तेव्हा कित्येक धक्कादायक बाबी आमच्या पुढे आल्या. त्यातील काही प्रमुख बाबी सर्वाच्या माहितीसाठी देत आहोत, त्या अशा -
१. सर्वात प्रथम येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, ‘दादोजी गोचिवडे’ हा वेगळा आहे आणि ‘दादोजी कोंडदेव’ हा वेगळा आहे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी गोचिवडे शाहाजीराजांकडे ज्या परगण्यांची वंशपरंपरागत पाटीलकी व देशमुखी जहागिरी होती त्या हिंगणी, बेरडी व देऊळगांव या परगण्यांचा कुलकर्णी व कानुंगो होता. तर दादोजी कोंडदेव हा विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. शाहाजीराजांनी इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत जी निजामशाही तथा शाहाजीशाही तथा मराठाशाही चालविली होती त्यांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता.
२. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार/सेनापती मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते.

लेखकाने ह्या परिच्छेदातील बाळपणी हा शब्दच खाऊन टाकला आहे. म्हणजे त्यास ‘शिवाजी महाराजांच्या बाळपणी दादोजी कोंडदेव महाराजांचे शिक्षक नव्हते’ याची पक्की माहिती असणार. आणि पुरावे तसेच सांगत आहेत, म्हणून त्या लेखकाने हा शब्दच गाळून टाकला.

३. इ.स. १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशाहाकडे शाहाजीराजांची जहागीर म्हणून होता. तेव्हा त्याचा कारभार शाहाजीराजांकडेच होता. त्या वेळेस दादोजी कांेडदेव विजापूरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शाहाजीराजांशी तथा शाहाजीराजांच्या पुणे परगण्याच्या कारभाराशी काहीही संबंध नव्हता.
४. इ.स. १६३६ च्या अखेरीस तथा इ.स. १६३७ च्या सुरुवातीस शाहाजी राजांचा मोगल व विजापूरकरांबरोबर झालेल्या तहानुसार ते विजापूरकरांकडे सामील झाले. त्यानंतर शाहाजीराजांच्या ताब्यातील भीमेच्या पलीकडील (दक्षिणेकडील) निजामशाही मुलूख आदिलशाहाच्या ताब्यात आला. त्यावर आदिलशाहाने ठाणी घातली. त्याचाच भाग म्हणून आदिलशाहाने पुण्यास ठाणे घातले. ते ठाणे दादोजी कोंडदेवामार्फत घातले गेले. तोपर्यंत दादोजीचा इ.स. १६३० मध्ये पुणे जाळण्याव्यतिरिक्त पुण्याशी काहीही संबंध नव्हता, तो संबंध त्याने विजापूरकरांसाठी पुण्यात ठाणे घातल्यानंतर आला.
५. तहानुसार आपल्याकडे आलेल्या शाहाजीराजांस आदिलशाहाने पुणे प्रांताची सरंजामी देऊन पाठविले कर्नाटकात, विजापूरच्याही दक्षिणेकडे आणि त्याने पुणे प्रांताचा कारभार सोपविला आदिलशाहाचा विश्वासू माणूस दादोजी कोंडदेवाकडे! (पादशाहानामा (IB १५०); Shivaji and his Times, 4th edn. पृ. १८१९; श्रीशिछ-त्र्यंशंशे. पृ. ३७१; श्रीशिछ सच - मराचिब प्रकरण २.२; सहा कलमी शकावली,). यावरूनही कोंडदेव कोणासाठी काम करीत होता व त्याची निष्ठा कोणावर होती हे स्पष्ट होते.
७. शाहाजीराजे, जिजामाता, शिवाजीराजे व त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे हे एकत्रितरीत्या प्रथम विजापुरास व तेथून पुढे बंगरूळास पोहोचले. तेथे शिवाजीराजांचे राहिलेले शिक्षण सुरू झाले. त्याचदरम्यान इकडे पुणे प्रांतात असलेल्या दादोजी कोंडदेवाने बंगरूळास शाहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, तिकडे जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो आपल्याबरोबर घेऊन तो विजापूरच्या सुलतानाकडे गेला. तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शाहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; परंतु आदिलशाहाची परवानगी घेऊन दादोजी कोंडदेव पुण्यास परतला. (शेडगांवकर भोसले बखर, छापील पृ. १८)
८. ज्या वेळेस दादोजी कोंडदेवाने शाहाजीराजांच्या पुणे जहागिरीचा महसूल गोळा करून विजापूरच्या खजिन्यात भरून शाहाजीराजांना न भेटता तो परस्पर परतला त्याच वेळी चाणाक्ष शाहाजीराजांच्या लक्षात त्याच्या निष्ठेची बाब आली. जर आपण आपला कारभार स्वत: पाहिला नाही तर आपल्या जहागिरीचे उत्पन्न आपणांस मिळू शकणार नाही हे त्यांनी ओळखले. आणि पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी जिजाऊंची व शिवाजी राजांची कारभारी मंडळासह नेमणूक केली व पूर्ण तजवीज करून पाठवणी केली. शाहाजीराजांनी जिजाऊंना व शिवाजीराजांना पुणे प्रांतास का पाठविले त्याचे हे प्रमुख कारण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
९. दादोजी कोंडदेवाची विजापूरकरांवरील निष्ठा व त्याने केलेली कामगिरी यामुळे आदिलशाहाने त्याला कोंढाण्याचा सुभेदार करून खास अधिकारी म्हणून नेमले होते. (Shivaji The Great, Vol I; P. ११, १८, ५५, ४३२ c.f. also Nos. ४३६, ४५६) (५७, ५०७, ५१३; श्रीशिछ-त्र्यंशंशे, पृ. ३७१; शिपसासं क्र. ४३२, ४३६) त्यामुळे जिजामाता व शिवाजीराजे यांनी स्वराज्याच्या उद्योगाचे काम दादोजी कोंडदेवाच्या परभारे स्वतंत्रपणे चालविले होते. स्वराज्याच्या उद्योगाचा कोणताही सुगावा तथा संबंध त्यांनी दादोजीस लागू दिला नाही. (शेडगावकर भोसले बखर, छापील पृ. ३५, ६७)

दादोजी कोंडदेवाने बंगरूळास शाहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शाहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; तो पुण्यास परतला.

शिवाजीराजांचे कुळ बुडण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीची निष्ठा शाहाजीराजे व जिजामातेवर असू शकते काय?
१०. मावळातील वतनदार स्वतंत्र वागत असत. शिवाजीराजांनी त्यांना आपल्या काबूत आणण्याचा उपक्रम केला. त्यांना सहाय्य करून त्यांची मने आपल्याकडे वळवून घेतली. ते वतनदार विजापूरकरांना जुमानीनासे झाले. यांपैकीच कृष्णाजी नाईक बांदल हे मावळातील एक वतनदार होते. ते आदिलशाही सुलतानांना मुळीच जुमानीत नव्हते, ‘दायिते देत नव्हते.’ दादोजी कोंडदेवास हे सहन झाले नाही, त्याने बांदलांवर हल्ला केला; परंतु यात कृष्णाजी बांदलांनी दादोजी कोंडदेवाचा पराभव केला. विजापूरच्या सुलतानासाठी आपला चोखपणा दाखविण्यास गेलेल्या कोंडदेवास बांदलांनी खरपूस चोप दिला.
११. राजांनी अति मेहनतीने, मोठी त्वरा करोन राजगड किल्ला बांधावयास काम चालविले. हे वतर्मान विजापूरचे पादशाहास जाहीर झाले. हे विजापूरचे सुलतानास कळले कसे? हे गुलदस्त्यातच आहे; परंतु विजापूरचा या भागातील सुभेदार म्हणून याचे दायित्व दादोजीकडे जाते. दादोजीने तसे केले नसते तर विजापूरकरांनी त्याची खरडपट्टी काढणारी आज्ञापत्रे पाठविली असती, परंतु असे घडले नाही.
१२. शिवाजीराजे स्वसत्तेने वागू लागले, विजापूरच्या पादशहाचे किल्ले व मुलूख काबीज करीत चालले, तेव्हा शिवाजीराजांना आवरण्यासाठी दादोजी कोंडदेव त्यांचा निषेध करून विरोध करू लागला; परंतु शिवाजीराजांनी आपला प्रयत्न थांबविला नाही.
दादोजी शिवाजीराजांना शिवथर घळीच्या बाजूने जावळीत तथा कोकणात उतरू देईनासा झाला. दादोजीच्या विरोधामुळे शिवाजीराजांना कोकणात उतरता येईना. याचे पर्यवसान कोंडदेवावरील स्वारीत झाले. अखेर या स्वराज्यविरोधकास- पुंड दादोजी कोंडदेवास कैद करून, त्याचे डोळे काढून कायमचा बंदोबस्त केला गेला (चि.ब. पृ. ५,७) व शिवाजीराजांनी जावळीत उतरण्याचा रस्ता मोकळा केला.
१३. दादोजी कोंडदेवाच्या विजापूरकरांवरील निष्ठेमुळे आदिलशाहाने त्याला कोंढाणा किल्ला व इतर महालांचा सुभेदार व खास अधिकारी नेमले होते, तो कोंढाणा किल्ला दादोजीने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यात दिला नव्हता, तो त्याच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी ताब्यात घेऊन स्वराज्यात सामील करून घेतला.
या सर्व विवेचनावरून व पुराव्यावरून दादोजी कोंडदेवाची निष्ठा कोणावर होती हे सांगण्याची आवश्यकता आहे का? जसा मुरार जगदेव तसाच दादोजी कोंडदेव! दोघेही आदिलशाही सरदार/सुभेदार. फरक इतकाच की, मुरार जगदेवाने रणांगणावर मर्दुमकी गाजविली आहे किंवा तशी धावपळ केली आहे. तर दादोजी कोंडदेवाने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले आहे आणि त्याचे त्यांना काय फळ मिळाले? इ.स. १६३५/३६ मध्ये मुरार जगदेवाला कैद करून आदिलशाहाच्या हुकमाने त्याची जीभ नरडय़ापासून काढून गाढवावर बसवून शहरातून िधड काढली गेली आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले (बु-उ-स, पृ. ३३०, ३३१) तर दादो कोंडदेव ह्या स्वराज्यविरोधकास शिवाजी राजांनी इ.स. १६४६ मध्ये कैद करून त्याचे डोळे काढविले. (चि.ब. पृ. ५,७). यामुळे तो मृत्यू पावला.
anant_adv@yahoo.co.in

संदर्भ : शिपसासं. क्र. ३१२; बु-उ-स पृ. २९८; शिचप्र. पृ. ७०-७१; बादशाहानामा, क्षीराशिछ-गभामे पृ. ५८३; शिचप्र. पृ. ७०-७१, ६. शिपसासं. क्र. ३१२; शिपसासं. क्र. ५१३; शेडगांवकर भोसले बखर, पृ. ३४, ३५, ६७; अछश्रीसंम - अविदा, पृ. २०४; सभासद बखर, ९१ क. ब. वगैरे; अछश्रीसंम - अविदा, पृ. २१२; शिपसासं क्र. ४३२; शिपसासं क्र. ७२२; शिचप्र. पृ. ७०-७१; अछश्रीसंम खं. १ ला. -अविदा पृ. १९, ४८, ५०, ५२, ६३, ७२, १५१, १५६, १५७, १८०, १८१, १९७, ३२५, ३६४, ३६६, ३६८, ३७०, ३७२, ३७४, ५३३, ५३४, ५३५, ५४५; श्रीशिछसच-मराचि६, पृ. २२०; ९१ कलमी बखर, पृ. १०; शिपसासं क्र/. ४९३; (हा विषय सखोलपणे समजून घेणेसाठी ‘अद्वितीय छ. श्रीसंभाजी महाराज खंड १ : १५४ ते १५६, १७९ ते १९८, १९९ ते २१८, २५९, २६०; खंड २ : पृ. ६०८, ६०९, ६१२, ६१३, ६१९ ते ६२३; खंड ३ रा : पृ. १०७५ ते १०८७)


Friday, January 7, 2011

शाहजीराजांनी पुणे वसविले..सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला..


७ जानेवारी २०११ च्या साप्ताहिक लोकप्रभामध्ये पांडुरंग बलकवडे ह्यांचा "दादाजीपंती सिउबास शहाणे केले" लेख छापून आला आहे..
ह्या लेखावरून कुठेही दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे दिसत नाही.. उलट बलकवडे ह्यांचा खोटारडेपणा दिसून येतो..इतिहास संशोधक जयसिंगराव पवार ह्यांनी दादोजी गुरु वा शिक्षक नव्हते हे पुस्तके,चर्चासत्रे,व्याख्याने,लेख ह्या माध्यमातून स्पष्ट केले असतानाही बलकवडे मात्र अजूनही त्यांचेच संदर्भ देतात..हा खोटारडेपणा तसा अनपेक्षितही नव्हता..

ह्या लेखाचा आशय बलकवडे ह्यांनी दिला आहे..तो असा..

पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित आहे.

ह्या लेखाचा समाचार घेताना कोल्हापूरचे इतिहास संशोधक ह्यांनी "चित्रलेखा" १७ जानेवारी २०११ मधून "दादोजीचा पुतळा हटला.. हे तो इतिहासाचे शुद्धीकरण" हा लेख लिहिला आहे... ह्या लेखाचा आशय थोडक्यात..

जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाने लालमहाल पुढच्या समूह शिल्पातील दादोजी कोंडदेवाच्या पुतळ्याचे कारस्थान उघडकीस आणले..हे कुणाच्या अज्ञानामुळे घडले ? त्याला जबाबदार कोण..? लाल महाल,दादोजी कोंडदेव आणि सोन्याच्या फळाची नांगरणी..ह्या बद्दल इतिहास काय सांगतो..??

सावंत लिहितात.. ...अनेक चुकांनी भरलेल्या बखरींचा आधार घेऊन त्यांनी दादोजीला गुरु ठरविणे योग्य नाही..कारण या बखरीबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात- मराठा साधनांपैकी एक्क्याणंव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय,उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारुडानी भरलेल्या आहेत..अशा बखरीमध्ये आलेला इतिहास हा आतापर्यंतच्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे..एवढच नव्हे तर पुण्याचे इतिहासकार मेहेन्दलेही या बख्रीमधील इतिहास टाकाऊ आणि खोटा समजतात..(वाचा: राजा शिवछत्रपती,पृ १००-११२ )
दादोजी कोंडदेवाने पुण्याच्या भूमीवर सोन्याचा नांगर धरला कि नाही,याचाही मागोवा घेऊ..

ह्या लेखात बलकवडे लिहितात ....
"पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फक्त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे :
‘शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तरफेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.’’
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे."

बलकवडे या शकावलीच सहावे कलम अपूर्ण देतात..मुळात ह्या शकावलीत लिहिले आहे

"शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भासले(भोसले) यांसि बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली सरंजामास मुलूक दिल्हे,त्यांत पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्यांनी आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलटनकर यासी सुभा सागून पुनियास ठाणे गातले.तेंव्हा सोह्ण्याचा नांगर पांढरीवर धरिला.शांती केली.मग सुभेदार यांनी कास्ब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.कोल्याचे वशे दिल्हे.सहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विजापूर प्रांती गेले "(कलम १)

बलकवडे ह्या शकावलीतले शेवटचे एक वाक्यच्या वाक्यच गाळतात..कारण ह्या वाक्यामुळे ह्या कलमाचा अर्थ स्पष्ट समजून येतो..सहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विजापूर प्रांती गेले हे वाक्य नसेल तर सोन्याचा नांगर धरलेली घटना दादोजी कोंडदेव याने केली,असे स्पष्ट होते.आणि शेवटचे वाक्य दिले तर सोन्याचा नांगर शहाजी महाराजांनी स्वतः धरल्याच स्पष्ट होते..हि सहा कलमी शकावली ऐतिहासिकदृष्ट्या फारशी महत्वाची नाही..तरीही या शकावलीतील इतिहास स्वीकारून निष्कर्ष काढायचा झाला तर,सोन्याचा नांगर पुण्याच्या पांढरी वर धरला असेलच,तर तो शाहजीराजांनी धरल्याचे स्पष्ट होते..

Tuesday, January 4, 2011

Tuesday, December 28, 2010

आनंदोत्सव .....



Dadoji Was Not Teacher Of Shivaji Maharaj - Historian Imran Habib...
दादोजी गुरू नव्हते : इमरान हबीब

Imran habib spoke to Star Majha On Dadoji Konddev Issue..saying dadoji was not a teacher of shivaji ..corporation has removed statue of dadoji..which is justice to shivaji's history...
महाराष्ट्रभरात शिवप्रेमिचा जल्लोष ....पेढे वाटून,फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा..
दादोजी कोंडदेव पुतळा हटविल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून येताच महाराष्ट्रभरात जल्लोष सुरु झाला.. ठिकठिकाणी पेढे वाटून,फटाके फोडून शिवप्रेमी आनंद व्यक्त करत होते... पुणे,मुंबई,कोल्हापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बुलढाणा,चंदपूर,नांदेड,नागपूर,यवतमाळ,उस्मानाबाद ह्या भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला..विशेष म्हणजे मराठवाड,खानदेश आणि विदर्भाच्या ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह दिसून येत होता.. शिवसेनेने ह्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेवूनही पुणे आणि औरंगाबाद येथे तुरळक घटना वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही..वेगवेगळ्या संघटना,राजकीय पक्ष आणि साहित्यिक ह्यांनी ह्या निर्णयाबद्दल भरभरून प्रतीक्रिया दिल्या आहेत..

दादोजी समर्थकांच्या बंदला प्रतिसादच नाही...पुणे सुरळीत...दादोजी समर्थक नाराज..

दादोजी समर्थकांच्या बंदला प्रतिसादच नाही...पुणे सुरळीत...दादोजी समर्थक नाराज..
पुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला अतिशय कमी प्रतिसाद मिळला आहे. पुण्यातले शाळा कॉलेजेस व्यवस्थित सुरु आहेत. तसेच बस सेवा आणि रिक्षाही सुरू आहेत. सकाळी पुण्यातल्या काही भागात बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास बसेस फोडण्यात आल्या.अनेक भागात दुकान सुरू आहेत. पीएमटी सेवाही सुरळीत सुरु आहे.पुण्याच्या सदैव गर्दी असणार्‍या लक्ष्मी रोडवरची अनेक दुकान सुरु आहेत. इतर ठिकाणच्या बाजारपेठ चालु आहे. एकंदर शिवसेनेच्या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही..."पुतळा हलविला बरे झाले.." असा सामान्य जनतेचा सूर होता..त्याच बरोबर काही दादोजी समर्थकांच्या फुसक्या आंदोलनाचा निषेधही होत आहे..