Friday, August 6, 2010

दादोजी कोडदेव हटवा....

Friday, August 06, 2010 AT 12:04 AM (IST)

पुणे - 'जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचा अवमान होऊ न देता सर्व जनतेने एकजुटीने आणि लोकशाही मार्गाने लढणे आवश्‍यक आहे,'' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी व्यक्त केले.जेम्स लेनच्या "शिवाजी - द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच हटविली. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी जनजागरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत आढाव बोलत होते. न्या. बी. जी. कोळसे पाटील, सत्यशोधक चळवळीच्या प्रतिमा परदेशी, समितीचे अध्यक्ष मुकुंद काकडे व्यासपीठावर उपस्थित होते.आढाव म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काहीही लिहिणे अथवा बोलणे असा नाही. त्यालाही काही मर्यादा आहेत. शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक लिखाण करणे, हा लेनचा हलकटपणाच आहे. हा प्रश्‍न न्यायालयासमोर गांभीर्याने न मांडल्यानेच पुस्तकावरील बंदी हटविली गेली. त्याविरोधात व्यापक आंदोलन करायला हवे.'' कोळसे पाटील म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असणाऱ्या मर्यादांमध्ये व्यक्तिगत अवमानाबाबत घटनेत स्पष्ट उल्लेख आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्याबद्दलचा खटला लढताना या बाबीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच या पुस्तकावरील बंदी हटवली गेली.'' परदेशी म्हणाल्या, "" या पुस्तकाच्या निमित्ताने समोर आलेल्या इतिहासाच्या विकृतीकरणाबाबत गाफील राहून चालणार नाही.

बावन्न जणांना अटक
भरतनाट्यमंदिरापासून कसबा पेठेतील लाल महालाजवळ निघालेल्या मोर्चाला फुटका बुरूज चौकात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात रात्री अडविले. कोळसे-पाटील यांच्यासह 52 जणांना अटक करून त्यांना शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. जमावबंदी आदेशाचा भंग करणे, अडथळा निर्माण करणे आदी कलमांन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त ज्ञानेश्‍वर फडतरे यांनी दिली. रात्री उशिरा आंदोलकांची जामिनावर सुटका झाली.

No comments: