Thursday, August 26, 2010

लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवा
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 25, 2010 AT 07:26 PM (IST)
Tags: lal mahal, pune, sambhaji brigade, municipal corporation
पुणे - "लाल महालातील शिल्पसमूहामधील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा चोवीस तासांत हलवावा,' असे पत्र महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापालिका आयुक्तांना बुधवारी दिले. या पत्राची प्रत महापौरांनी लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिली. लोकशासन आंदोलनातर्फे दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्यासाठी बुधवारी दुपारपासून महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदिवासी, कातकरी, मच्छीमार सहभागी झाले होते.
लोकशासन आंदोलनाचे संस्थापक निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, बद्रिनाथ तनपुरे महाराज, प्रतिमा परदेशी, रवींद्र माळवदकर, विकास पासलकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. "पुतळा हटविण्याचा निर्णय घ्या, नाही तर अटक करा,' अशी भूमिका या वेळी आंदोलकांनी घेतली. नंतर आंदोलन सुरू असताना महापौरांनी येऊन "पक्षनेत्यांची तातडीने बैठक घेऊन चोवीस तासांत पुतळा हटविण्याचा निर्णय घेण्यात येईल,' असे जाहीर केले. त्यानंतर सायंकाळी पक्षनेत्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर माहिती देताना महापौर म्हणाले, ""लोकशासन आंदोलन, संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक दिवसांपासून पुतळा हटविण्याची मागणी करीत आहेत.
या संदर्भात महापालिकेने राज्य सरकारकडे पत्र पाठविले होते. त्यावर दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही, असे राज्य सरकारने महापालिकेला कळविले होते. तसेच महापालिका स्तरावर याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले होते. लाल महालात बसविण्यात आलेल्या शिल्पसमूहास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या शिल्पातील कोंडदेव यांचा पुतळा येत्या 24 तासांत तेथून हलविण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र आपण आयुक्तांना दिले आहे.''
"शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती व शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात हा पुतळा काढण्याबाबत निर्णय घ्यावा,' असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, रात्री आठनंतर कोळसे पाटील यांच्यासह 53 जणांना पोलिसांनी अटक केली. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला. त्यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. पुतळा हलविण्याचे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिल्यावर त्याची प्रत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन कोळसे पाटील यांना दिली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अटक केलेल्या पाच महिलांसह सर्वांची रात्री उशिरा जामिनावर सुटका करण्यात आली.तत्पूर्वी, महापालिका भवनासमोर झालेल्या सभेत न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणाले, ""शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील होते, हा मुद्दा स्वयंसिद्ध आहे. तो वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांना खुमखुमी आहे, ते असा प्रश्‍न उपस्थित करून अन्न, वस्त्र, निवारा या प्रश्‍नांपासून समाजाला बाजूचा नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशात महापुरुषांबद्दल घाणेरडे बोलण्याचा मानसिक महारोग झाला आहे. जाणूनबुजून बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.''
कोळसे पाटील म्हणाले, ""सर्व कष्टकरी, आदिवासी, कुणबी या आंदोलनात आहेत. जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. त्यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. शिवाजी महाराजांनी मच्छीमारांना आरमार मिळवून दिले, तर आदिवासी, कातकऱ्यांना राजा केले. त्यामुळे शिवाजी महाराज हे एका जातीची मक्तेदारी नाही. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याच्या माध्यमातून अन्यायाच्या लढाईची ही सुरवात आहे. जेम्स लेनने लिहिलेल्या पार्श्‍वभूमीवर हा पुतळा हलविणे आवश्‍यक आहे.''
तनपुरे महाराज म्हणाले, ""लोकशासन आंदोलनाबरोबर सर्व वारकरी, कष्टकरी आहेत. या आंदोलनात आम्ही आघाडीवर राहू.''
... लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही"

लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्याचा हा लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही. दादोजींच्या नावाने अभिजन वर्गात शंभर वर्षांपासून कुजबूज होती. या पार्श्‍वभूमीवर हा पुतळा काढलाच पाहिजे. महापालिकेने पुतळा काढण्याचा निर्णय घेतल्याने दलित, आदिवासी, मच्छीमार, कातकरी या सर्वांसह या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचा विजय झाला आहे,' अशी प्रतिक्रिया कोळसे पाटील यांनी रात्री "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

No comments: