ठाणे - दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचे नाव न बदलल्यास ठाण्यात होणारे मराठी साहित्य संमेलन उधळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन चव्हाण यांनी दिला आहे. त्यासाठी उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 24 संघटनांचा सहभाग असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शासकीय विश्रामगृहात जनार्दन चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलन उधळण्याचा इशारा दिला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा पुरावा आम्ही सादर केला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वारंवार दादोजी कोंडदेव यांच्या नावाने असलेल्या क्रीडा प्रेक्षागृहाचा उल्लेख होत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या विषयावर ठाण्याचे महापौर अशोक वैती यांना पत्र दिले होते. तसेच जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनाही पत्र देऊन दादोजी कोंडदेवांच्या नावाने असलेल्या क्रीडाप्रेक्षागृहात संमेलन घेण्यास विरोध असल्याचे कळविले होते. त्यावेळी चर्चेला बोलावण्याऐवजी मला कारवाईची नोटीस बजावण्यात आली, पण माझ्यावर कारवाई झाली तरी मी आंदोलन मागे घेणार नाही. मराठी साहित्य संमेलनाला आमचा विरोध नाही. केवळ कार्यक्रमाच्या स्थळाच्या नावाला आक्षेप आहे. आमच्या विरोधाची दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी संभाजी ब्रिगेडतर्फे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाच्या नावावर दुसरे नाव लावण्याचा इशारा जनार्दन चव्हाण यांनी दिला आहे.
ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितलं तर संरक्षण पुरवू तसेच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत केले.
पुणे येथील जाणता राजा हे महानाट्य उधळून लावणार -संभाजी ब्रिगेड
बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हे महानाट्य पुण्यात होत असून ते उधळून लावण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे..बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी जेम्स लेन ला मदत केल्याचा आरोप गेल्या काही वर्षात अनेक संघटनानी केला आहे.त्या पार्श्वभूमीवर पुरंदरे हे रामदास आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड व अन्य संघटना आक्रमक झाल्या आहेत
दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदला अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी केला होता. आर. आर. पाटील यांनी सावध भूमिका घेत वाद टाळण्याचा सल्ला दिला मात्र जाणता राजा यां महानाट्यातील दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या व्यक्तीरेखा वगळा अन्यथा प्रयोग होऊ देणार नाही याबाबतच्या प्रश्नावर भाष्य करणं आबांनी टाळलं.
No comments:
Post a Comment